नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. सर्वच देशांची आर्थिक स्थिती कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे डबघाईला येत आहे. महासत्ता समजल्या जाणाऱ्या देशांनाही मोठे नुकसान सहन कराव लागत आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे त्या देशांना अधिकच फटका बसणार आहे. कोरोनाचा फटका भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसणार असून येथे कोरोनानंतर १३.६ कोटी नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतात सध्या २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील ताजनगरी अर्थात आग्र्याला पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र आता आग्रा निर्मनुष्य झाला आहे. फेब्रुवारीनंतर पर्यटनात मोठी कमी आली आहे. पर्यटनात पुढील सहा महिने उठाव दिसणार नाही. त्यामुळे ट्रॅव्हल एजन्सिजच्या शेकडो कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. अशा स्थिती कार, बसेस धुळ खात पडून राहणार आहेत. तर या कर्मचाऱ्यांना सहा महिने घरी बसून पगार द्यावी लागणार आहे. मात्र हे सर्वांनाच शक्य नाही. अशा स्थितीत अनेकांच्या नोकरीवर संकट येणार आहे.
नोकरी जाण्याचे संकट सर्वाधिक अशा ठिकाणी आहे, जिथे कर्मचाऱ्यांना नियमीत पगार मिळत नाही. पर्यटन उद्योगात देखील नियमीत पगार दिला जात नाही. अनेक लोक कोणत्याही कराराशिवाय काम करतात. यामध्ये गाईड देखील समील आहेत. दुकान, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे पर्यटन आणि सेवा क्षेत्रातील तब्बल २ कोटी नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही क्षेत्र सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. ऑक्टोबरनंतरच या क्षेत्रात सुधारणा होईल अशी आशा आहे.
पर्यटन आणि सेवा क्षेत्राप्रमाणेच मॅन्युफॅक्चरिंग आणि नॉन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची स्थिती आहे. मागणी कमी झालेली असताना अनेक लोकांच्या नोकऱ्या सध्या टिकून आहेत. मागणी घटल्याने नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार नाहीच. मात्र ज्यांच्या नोकऱ्या टीकून आहेत, त्यांच्यावर देखील संकट आहे. एकूणच संपूर्ण देशात १३.६ कोटी नोकऱ्यांवर टांच येण्याची शक्यता आहे. यामध्ये नॉन एग्रीकल्चर क्षेत्रासह अनेक क्षेत्रांचा समावेश असणार आहे.