नवी दिल्ली : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असताना एक चांगली बातमी आहे. देशातील दरराेज आढळणाऱ्या नव्या रुग्णाच्या संख्येत माेठी घट झाली आहे. तब्बल ६३ दिवसांनी एक लाखांच्या आत नवे रुग्ण आढळले आहेत.
मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात ८६ हजार ४९८ नव्या काेराेना रुग्णांची नाेंद झाली आहे. तर २१२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत १७ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली हाेती. त्यानंतर ४ एप्रिलला नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा १ लाखांच्या वर गेला. तेव्हापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत हाेती.
देशात ५ मे रेाजी प्रथमच ४ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले हाेते. तर ८ मेपासून दैनंदीन रुग्णसंख्येत घट हाेण्यास सुरूवात झाली. तब्बल ६३ दिवसांनी नव्या रुग्णांचा आकडा एक लाखांच्या खाली आला असून हा ६६ दिवसांचा निचांकी आकडा आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. दिवसभरात ९७ हजार ९०७ रुग्ण बरे झाले आहेत.
परदेशात जायचे आहे; २८ दिवसांनी दुसरा डोस- केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी गाईडलाईन जारी केली आहे. यानुसार ज्याला परदेशात जायचे आहे त्याला पहिल्या डोसच्या २८ दिवसांनंतर कधीही कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येईल. - गाईडलाईन असे म्हणते की, परदेशात जाण्यासाठी केवळ कोविशिल्ड लस घेतलेल्यांनाच लसीकरण प्रमाणपत्र पासपोर्ट क्रमांकाच्या उल्लेखासह देण्यात येईल. यासाठी भारताची दुसरी लस कोव्हॅक्सिन क्वालिफाय करत नाही.
विशेष श्रेणीतील लोकांनाच सूट ही गाईडलाईन केवळ, १८ वर्षांवरील आणि ३१ ऑगस्टपर्यंत परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठीच जारी करण्यात आलेली आहे. यात शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी परदेशात जाणारे लोक, टोकियो ऑलिम्पिक्स गेम्समध्ये सहभागी असलेले विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या स्टाफचा समावेश असेल.
लसीकरणाला वेगआतापर्यंत २३ काेटी ६१ लाखांहून अधिक डाेस देण्यात आले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये ३३ लाख ६४ हजार ४७६ डाेस देण्यात आले. त्यापैकी ३० लाख ३८ हजार २८९ जणांनी पहिला तर ३ लाख २६ हजार १८७ जणांनी दुसरा डाेस घेतला. आतापर्यंत १८ काेटी ९५ लाख ९५ हजार जणांना पहिला तर ४ काेटी ६६ लाख नागरिकांना दाेन्ही डाेस देण्यात आले आहेत. मे महिन्यात सरासरी १७ ते १८ लाख डाेस दरराेज देण्यात येत हाेते.