नवी दिल्ली : सलग चौथ्या दिवशी देशात कोरोनाचे एक लाखांहून कमी रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांची संख्या ९१,७०२ असून, ३४०३ जण मरण पावले. सक्रिय रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे.
देशात २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ७७ लाख ९० हजार ७३ जण बरे झाले आणि एकूण ३ लाख ६३ हजार ७९ जण मरण पावले. बिहारने कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या आकड्यात बुधवारी ३९७१ ने दुरुस्ती केल्याने गुरुवारी ६१३८ मरण पावल्याचे दिसून आले होते. मात्र, गुरुवारी दिवसभरात साडेतीन हजारांपेक्षा कमी मृत्यू झाले. ६१ दिवसांनंतर रुग्ण ११ लाख २१ हजार ६७१ वर आले आहेत.
गेल्या चोवीस तासांत १ लाख ३४ हजार ५८० जण बरे झाले. हे प्रमाण ९४.९३ टक्के आहे. सलग २९ व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त आहेत. कोरोना संसर्गाचे दर आठवड्याचे, दररोजचे प्रमाण अनुक्रमे ५.१४ टक्के व ४.४९ टक्के आहे. संसर्गाची पातळी सलग १८ व्या दिवशी १० टक्क्यांच्या खाली राखण्यात यश मिळाले आहे.इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितले की, आतापर्यंत ३७ कोटी ४२ लाख ४२ हजार ३८४ कोरोना चाचण्या झाल्या असून, २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९ डोस लोकांना देण्यात आले आहेत.
जगात १ कोटी २३ लाख सक्रिय रुग्ण- जगभरात एकूण १७ कोटी ५६ लाख रुग्णांपैकी १५ कोटी ९१ लाख जण बरे झाले आहेत.- ३७ लाख ८८ हजार जणांचा बळी गेला आहे. जगात १ कोटी २३ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.
अमेरिकेत सव्वासहा लाख बळी- अमेरिकेमध्ये कोरोनाचे ३ कोटी ४२ लाख रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी ८२ लाख लोक बरे झाले असून, सव्वासहा लाख लोक मरण पावले आहेत. त्या देशात ५३ लाख ८३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - ब्राझीलमध्ये १ कोटी ७२ लाख कोरोना रुग्ण असून, आतापर्यंत ४ लाख ८२ हजार लोक मरण पावले आहेत.