नवी दिल्ली : मनसुख मंडाविया (Mansuskh Mandaviya) यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. गुजरातच्या सौराष्ट्रमधील भाजपा नेते मनसुख मंडाविया यांनी डॉ हर्षवर्धन यांची जागा घेतली आहे. देशातील कोरोना संकटामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महत्त्व सध्या बरेच वाढले आहे.
पदभार स्वीकारताच मनसुख मांडविया यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे, ते म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट रोखणे. दरम्यान, या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मात्र, यासाठी मनसुख मांडविया यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील. यादरम्यान, त्यांना केवळ लस पुरवठा वाढविता येणार नाही तर लस केंद्रांची संख्याही वाढवावी लागेल.
विशेषत: देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात त्यांना लसी वेळेवर पोहोचण्याची खात्री करावी लागेल. देशातील बर्याच क्षेत्रातील लोकांच्या मनात या लसीबाबत अजूनही संशय आहे. लसीकरण मोहिमेतील प्रचाराच्या माध्यमातून हा संशय सरकारला दूर करावा लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्यासमोर आणखी एक आव्हान म्हणजे कोरोना संक्रमणाची गती थांबवणे आहे. देशातील काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही खूपच जास्त आहे.
राजस्थान, केरळ, मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. केरळमध्ये गेल्या 10 दिवसात कोरोनाचे 12 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. याचबरोबर, मनसुख मंडाविया यांना रसायन व खते मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे. कोरोनामुळे देखील हे एक अतिशय महत्त्वाचे मंत्रालय आहे. औषधनिर्माण विभाग देखील या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे त्यांना औषधे व लसींच्या निर्मितीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
कोरोनात सत्कार समारंभ टाळा, लगेचच कामाला लागा - नरेंद्र मोदी कोरोनाच्या काळात सत्कार आणि सोहळे यांना फाटे द्या. जनतेत जा. त्यांचे प्रश्न समजून घ्या. सोशल मीडिया वा एकूणच माध्यमे यांना मुलाखती टाळा. मात्र घेतलेल्या निर्णयांची नीट माहिती द्या, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आधी कॅबिनेट मंत्री व नंतर राज्यमंत्री यांची बैठक घेतली. त्यावेळी नव्या मंत्र्यांनी आठवड्याचे पाच दिवस दिल्लीत थांबून आपापल्या मंत्रालयाचा, कामाचा अभ्यास करावा. अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी, पण त्यांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहू नका, अशा सूचना मोदींनी सर्व मंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात आले.