नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करताना भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्यासाठी आता अधिक काळ लागत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे मरणारांचा दर जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. गेली 14 दिवस देशातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 10.5 एवढा होता. तो आज जवळपास 12 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच आपला मृत्यूदर 3.2 टक्के एवढा आहे. हा मृत्यू दर जगात सर्वात कमी आहे. तसेच 10 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे.
आतापर्यंत 10,632 जण ठणठणीत -आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 10,632 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी एक रुग्ण परदेशातही गेला आहे. कोरोना मृतांची संख्या 1,301 एवढी झाली आहे. तर कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता 39,980 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, आता 28,046 लोक कोरोनाबाधित आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू -कोरोनामुळे आतापर्यंत 1,301 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एकट्या महाराष्ट्रातील 521, गुजरातमधील 262, मध्य प्रदेशातील 151, राजस्थानातील 65, दिल्लीतील 64, उत्तर प्रदेशातील 43, पश्चिम बंगाल तसेच आंध्र प्रदेशातील प्रत्येकी 33, तामिलनाडूतील 29, तेलंगाणातील 28 तर कर्नाटकातील 25 जणांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण -देशाचा विचार करता, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 12,296 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 2,000 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
11 दिवसांत 20 हजार रुग्ण -देशात 22 एप्रिलला कोरोनाचे 20,471 रुग्ण होते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 12 आठवडे लागले. यानंतर केवळ 11 दिवसांतच म्हणजे 3 मेला सकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 40 हजारांवर पोहोचली आहे. यादरम्यान केसेसचा डेली ग्रोथ रेट 5.2 ते 8.1 टक्क्यांदरम्यान होता. देशात 24 मार्चपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर 39,500 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत.