नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीने लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. एका अहवालात म्हणण्यात आले आहे, की फेब्रुवारी ते मेपर्यंत देशात ‘रिमोट वर्क’ (दूर रहून कार्यालयीन काम) असलेल्या नोकऱ्यांच्या शोधात 377 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अहवालानुसार, नोकरी शोधनारे लोक रिमोट वर्किंगसाठी अधिक इच्छुक आहेत. जॉब साइट इंडीडच्या अहवालानुसार, नोकरी शोधताना ‘रिमोट’, वर्क फ्रॉम होम आणि अशाच पद्धतीच्या इतर शब्दांचा अधिक वापर केला जात आहे.
फेब्रुवारी ते मे, 2020दरम्यान रिमोट वर्कसाठी केल्या जाणाऱ्या सर्चमध्ये तब्बल 377 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर घरून काम म्हणजे वर्क फ्रॉम होम साठीच्या नोकऱ्यांमध्ये 168 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.
इंडीड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शशी कुमार म्हणाले, ‘‘कोविड-19ने अनेक लोकांची काम करण्याची पद्धत बलदली आहे. लोकांचा रिमोट वर्ककडे कल वाढला आहे. सध्या हे असेच राहील असा अंदाज आहे.’’ तसेच, उद्योगांनाही भविष्यात याच प्रकारचे नोकरदार तयार करण्यावर लक्ष द्यावे लागेल.
पूर्वेकडील अभ्यासांतही हीच गोष्ट समोर आली आहे, की नौकरी शोधणारे 83 टक्के लोक आता रिमोट वर्कलाच अधिक महत्व देत आहेत. एवढेच नाही, तर 53 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना रिमोट वर्कचा पर्याय उपलब्ध झाल्यास, ते काही प्रमाणात वेतन कमी घेण्यासही तयार आहेत.