कोरोना लाटांमुळे अवघे जग हैराण असताना डेल्टा विषाणू आला आणि त्याने जगभरात हाहाकार माजवला. पण डेल्टापेक्षा सातपट अधिक खतरनाक विषाणू आफ्रिकेत सापडला आहे. डेल्टा विषाणूमुळे शंभर दिवसात जी रुग्णसंख्या वाढत होती ती या नव्या विषाणूने केवळ पंधरा दिवसात गाठली आहे. यावरून नव्या विषाणूचा धोका समजून येऊ शकतो. का घडतेय असे? नेमके या विषाणूमध्ये आहे तरी काय? डेल्टापेक्षा हा नवा विषाणू वेगळा कसा? जाणून घेऊ...
या विषाणूचे नाव काय?सुरुवातीला या विषाणूला आफ्रिकेत न्यू असे म्हटले जात होते. पण हा विषाणू आता ओमिक्रॉन या नावाने ओळखला जात आहे. हा विषाणू सर्वात वेगाने पसरणारा असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
लसीचा असर होणार का?सध्या तरी यावर अभ्यास सुरू आहे. मात्र, या विषाणूंसाठी लसी तयार केल्या गेल्या त्यापेक्षा हा नवा ओमिक्रॉन नावाचा प्रकार वेगळा आहे. त्यामुळे यावर लसीचा फारसा परिणाम होईल असे सध्या तरी तज्ज्ञांना वाटत नाही. लसीचा प्रभाव त्यावर झाला तरी तो कमी प्रमाणात असेल आणि तज्ज्ञांसाठी हीच खरी चिंतेची बाब आहे.
हा विषाणू घातक कशामुळे?या ओमिक्रॉन विषाणूचेच ५० म्युटेशन्स आहेत. हे म्युटेशन्स आधी वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.यातील स्पाईक प्रोटिनमध्येच ३० म्युटेशन्स आहेत. स्पाईक प्रोटिनवरच कोरोना लसीची मात्रा हावी होते. मात्र, जेवढे जास्त म्युटेशन्स या स्पाईक प्रोटिनमध्ये असतील, तेवढा लसीचा असर कमी असेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. आपल्या शरीरात विषाणू शिरल्यानंतर सेल्सच्या संपर्कात येणारा आणि त्यातून मग शरीरावर हावी होणारा काही भाग विषाणूमध्ये असतो. त्याला रिसेप्टर बायंडिंग डोमेन असे म्हणतात. त्याचे प्रमाण या ओमिक्रॉनमध्ये १० आहे. हेच प्रमाण डेल्टामध्ये केवळ २ होते.
भारतात त्या प्रवाशांना बंदी आहे का?भारतात अद्याप आफ्रिकी देशांतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आलेली नाही.मुंबई विमानतळावर आफ्रिकी देशांतून येणाऱ्यांना १४ दिवसांचे क्वॉरंटाइन सक्तीचे करण्यात आले आहे. त्यांची टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंगही करण्यात येत आहे.