नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये भयावह पद्धतीने वाढ झाली आहे. देशात आज एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा व्हेरिएंटसोबत ओमायक्रॉन व्हेरिएंटही देशात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. तसेच ओमायक्रॉनच्याही ३ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली असून, अनेक राज्यांमध्ये आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.
हल्लीच जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि मिशिगन विद्यापीठामध्ये बायोस्टॅटिस्टिकच्या प्राध्यापक भ्रमर मुखर्जी यांनी भारतातील कोरोनाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्राध्यापक भ्रमर मुखर्जी ह्या गेल्या दोन वर्षांपासून भारताच्या कोविड-१९मधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भ्रमर मुखर्जी यांनी पुढे सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील स्थितीच्या आधारावर सांगायचे तर भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जेवढे मृत्यू झाले त्याच्या ३० ते ५० टक्के मृत्यू हे ओमायक्रॉनमुळे होऊ शकतात.
भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे देशातील अनेक लोकांना कोरोनाच्या लसीचे एक किंवा दोन डोस दिले गेले आहेत. तसेच अनेकांना कोरोनाचा संसर्गही झालेला आहे. आमच्या अंदाजानुसार अशा लोकांची संख्या ४० टक्के आहे. म्हणजेच बुस्टर डोसच्या मदतीशिवायही लोकसंख्येतील हा मोठा भाह ओमायक्रॉनमुळे होणाऱ्या संसर्गामुळे बाधित झाला तरी लवकर रिकव्हर होईल. तसेच कदाचित लसीकरणामुळे ओमायक्रॉनमुळे बाधित झालेल्यांना रुग्णालयात भरती होण्याची वेळही येणार नाही. मात्र या सर्व बाबी केवळ अंदाजावर आधारित आहेत, यामधील अनेक गोष्टी खऱ्या ठरू शकतात. तर काही चुकीच्याही ठरू शकतात.
दरम्यान, भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, भारतामध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गाचे गांभीर्य आणि मृत्युदराचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. कारण येथील रुग्णालयामध्ये दाखल होण्याचे योग्य आकडे आणि मृत्यूदराचे आकडेही उपलब्ध नाही आहेत. आपण अमेरिकेमध्येही तेथील मृत्यूचा आकडा हा ओमायक्रॉन आणि डेल्टामुळे नाही तर खराब आरोग्य अवस्थेमुळे होत आहे.