नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,549 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी या काळात कोरोनाचा धसका घेतला. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मेघालयमध्ये कोरोनाकाळात 61 माता, 877 बालकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना काळात संसर्गाच्या भीतीपोटी अनेक गर्भवती महिलांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आणि त्यांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. मेघालयमध्ये कोरोना कालावधीत गर्भवतींनी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने 61 माता आणि 877 नवजात बाळांचा मृत्यू झाला, अशी माहिती मेघालय सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला दिली आहे. कोरोनाकाळात मेघालयात गर्भवती माता आणि बाळांचे मृत्यू वाढल्याची दखल घेत आयोगाने राज्य सरकारकडे माहिती मागितली होती. मेघालयातील अशा मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याची नोंद राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतल्यानंतर मेघालय सरकारने याबाबत कृती अहवाल आयोगाला सादर केला आहे.
वैद्यकीय मदत न मिळाल्याने यातील बहुसंख्य मृत्यू झाले आहेत. कोरोना चाचणी करण्यास नकार दिला जात होता, तसेच गर्भवती महिला कोरोना संसर्गाच्या भीतीने रुग्णालयात दाखल होत नव्हत्या, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसचं नवीन म्यूटेशन विध्वंस आणू शकतो. हा नवीन प्रकार डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की हे नवीन कॉम्बिनेशन व्हायरसबद्दल आधीच भीती होती कारण ते दोन्ही खूप वेगाने पसरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या नव्या संशोधनातून हे समोर आलं आहे.
डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन घडवू शकतात विनाश; WHO ने दिला धोक्याचा इशारा
WHO मध्ये कोरोना टेक्निकल टीमचे नेतृत्व करणाऱ्या मारिया वॅन कर्खोव यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की हे अपेक्षित होतं, विशेषत: हे दोन्ही प्रकार खूप वेगाने पसरत आहेत. WHO या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि या संदर्भात अभ्यास सुरू आहे. जेव्हा सुरुवातीला लोकांना डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारांच्या एकत्रित प्रकाराची भीती वाटली आणि त्याला डेल्टाक्रोन म्हटलं गेलं, तेव्हा WHO ने सांगितले की डेल्टा आणि ओमाक्रॉन कॉम्बिनेशन असं काहीही नाही. मारिया यांनी स्पष्ट केलं की एक व्यक्तीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारांचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनामुळे काही ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.