नवी दिल्ली: कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दलचा एक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारतात कोरोनामुळे ४७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोना बळींची एकूण संख्या ५ लाखांपेक्षा थोडी अधिक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे.
भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्या तांत्रिक प्रारुपाच्या मदतीनं जागतिक आरोग्य संघटनेनं आकडेवारी गोळा केली, ते प्रारुपचं योग्य नसल्याचा भारत सरकारचा दावा आहे. भारतानं आक्षेप नोंदवल्यानंतरही जागतिक आरोग्य संघटनेनं जुन्या प्रारुपाच्या माध्यमातून मृतांचे आकडे जाहीर केल्याचं सरकारनं निवेदनात म्हटलं आहे. भारतानं चिंता व्यक्त करूनही जागतिक आरोग्य संघटनेनं दुर्लक्ष केल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेले आकडे केवळ १७ राज्यांचे आहेत. ती राज्यं कोणती तेदेखील जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलेलं नाही. हे आकडे कधी गोळा केले, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं गणिती प्रारुपाच्या माध्यमातून आकडेवारी गोळा केली. मात्र भारतानं नुकताच विश्वसनीय CSR अहवाल जारी केलेला आहे, असं सरकारनं म्हटलं आहे.
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगभरात गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दीड कोटी लोकांचा जीव गेला. यापैकी ४७ लाख लोक भारतातील आहेत. हे आकडे गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेयियस यांनी म्हटलं आहे. आरोग्यविषयक आणीबाणींचा सामना करण्यासाठी सगळ्याच देशांनी आणखी तयार करायला हवी. भविष्यातील संकटांसाठी अधिक तरतूद करायला हवी, असं घेब्रेयियस म्हणाले.