नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं जगभरात अनेक देश त्रस्त आहेत. अमेरिका, रशिया यांसारख्या बलाढ्य देशांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस हा चीनच्या प्रयोगशाळेतच बनवण्यात आल्याचा आरोप अमेरिकेकडून वारंवार केला जात आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात चीन आणि डब्ल्यूएचओच्या भूमिकेबद्दल जगातील अनेक देशांना संशय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्याच पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी NDTV या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे, त्यात त्यांनी मोठा खुलासा केला. कोरोना व्हायरस लॅबमधूनच आला आहे. तो नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिम व्हायरस आहे, असंही ते म्हणाले आहेत. कोरोना विषाणूसह जीवन जगण्याची कला आपण शिकली पाहिजे. कोरोना विषाणू प्रथम चीनच्या वुहान शहरात दिसून आला आणि त्यानंतर तो जगभरात पसरला. हा नैसर्गिक विषाणू नाही, तो प्रयोगशाळेत बनविला गेला आहे. बरेच देश कोरोनावर लस तयार करण्याचे काम करत आहेत, परंतु त्यात यश मिळालेलं नाही, असेही गडकरी म्हणाले आहेत. अनेक देश या प्राणघातक विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान लॅबमधून झाल्याचा आरोप करत आहेत. त्याचदरम्यान नितीन गडकरींनी केलेले हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची आधी ओळख पटणे आवश्यक आहे. या विषाणूला तात्काळ ओळखता येईल, अशी कार्यपद्धती शोधून काढण्याची गरज आहे. कारण हा व्हायरस कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही. लवकरच भारत या विषाणूवर मात करेल. भारतासह अनेक देश लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या विषाणूला चीन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच या विषाणूला ट्रम्प हे चिनी विषाणू म्हणून संबोधतात.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही स्थलांतरित मजुरांच्या स्थलांतरणावर भाष्य केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे प्रभारी मंत्री गडकरी म्हणाले की, या प्राणघातक विषाणूच्या भीतीने प्रवासी कामगार आपापल्या घरी गेले आहेत. व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यावर स्थलांतरित मजूर कामावर परत येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आम्ही कोरोनाविरुद्ध युद्ध तसेच आर्थिक युद्धही लढत आहोत, असेही ते म्हणाले.
CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 7:29 AM
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्याच पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे.
ठळक मुद्देकोरोना व्हायरसच्या संक्रमणानं जगभरात अनेक देश त्रस्त आहेत.अमेरिका, रशिया यांसारख्या बलाढ्य देशांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.कोरोना विषाणूच्या संदर्भात चीन आणि डब्ल्यूएचओच्या भूमिकेबद्दल जगातील अनेक देशांना संशय आहे.