नवी दिल्ली : देशात सोमवारी कोरोनाचे १ लाख ६३६ रुग्ण आढळून आले. गेल्या दोन महिन्यांतील नव्या रुग्णांची ही सर्वात कमी संख्या आहे. बरे झालेल्यांची संख्या सोमवारी १ लाख ७४ हजार ३९९ झाली असून, कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या २४२७ आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा सलग २५व्या दिवशीही जास्त होते.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात २ कोटी ८९ लाख ९ हजार ९७५ कोरोना रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी ७१ लाख ५९ हजार १८० जण या संसर्गातून बरे झाले. कोरोना बळींची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार १८६ झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. सोमवारी सक्रिय रुग्णांची संख्या १४ लाख १ हजार ६०९ इतकी नोंदली गेली.
देशात कोरोना लसीचे २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४७२ डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी ८०,७४५ ने घट झाली आहे. सलग अकराव्या दिवशी देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखांपेक्षा कमी आहे.
जगभरात १७ कोटी ४० लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी ७० लाख रुग्ण बरे झाले. १ कोटी २९ लाख रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून आजवर ३७ लाख ४४ हजार जण मरण पावले आहेत.