नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये २५ हजार १५३ नवे रुग्ण सापडले असून, त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ एवढी झाली आहे. एक कोटी कोरोनाबाधित रुग्ण असलेला भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत असून, सध्या देशात केवळ ३ लाख ८ हजार ७५१ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये २५ हजार १५३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ लाख ४५ हजार १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख आठ हजार ७५१ एवढी आहे.
corona virus : भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला एक कोटीचा टप्पा
By बाळकृष्ण परब | Published: December 19, 2020 10:06 AM