बिजिंग : जगभरात कोरोनाने माजविलेला हाहाकार सुरूच असून चीनमध्ये या साथीमुळे शुक्रवारी आणखी सात जण मरण पावले. त्यामुळे या विषाणूने चीनमध्ये बळी पडलेल्यांची संख्या ३,१७६वर पोहोचली आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची त्या देशातील संख्या आता ८०,८१३ झाली आहे. त्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण हुबेई प्रांतामध्ये गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी आढळून आला होता. हा रुग्ण ५५ वर्षे वयाचा आहे.कोरोनाची साथ आणखी फैलावण्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. आपण अद्याप कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचणी करून घेतलेली नाही असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ब्रिटन वगळता युरोपातल्या अन्य देशांतील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या साथीमुळे भारताने काही अपवाद वगळता सर्व व्हिसा रद्द केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी अमेरिकेतील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन सुरु केली आहे.