नवी दिल्ली : १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा तसेच विदेशी प्रवाशांच्या तपासणीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याच्या याआधी घेतलेल्या निर्णयाचा ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार व कोरोनाची जागतिक स्थिती यांचे निरीक्षण करून त्यानुसार आढावा घेण्यात येईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने रविवारी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत ठरविण्यात आले. ओमिक्रॉनची स्पाईक प्रोटिनमध्ये आतापर्यंत ३० पेक्षा अधिक परिवर्तने झाली आहेत. या विषाणूमुळे कोरोना लसी काही प्रमाणात निष्प्रभ होण्याची शक्यता असल्याचे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
कोरोना साथीचा जिथे अधिक फैलाव आहे अशा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. केंद्रीय गृह खात्याचे सचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत ओमिक्रॉन व जागतिक कोरोना स्थितीची माहिती घेतली होती. ओमिक्राॅनची बाधा झालेले रुग्ण आता जर्मनी, इटली या देशांतही आढळले आहेत.
ओमिक्राॅन विषाणूमुळे कोरोना लसींची परिणामकारकता कमी झाल्यास भारतातील लसींचेही त्या दृष्टीने मू्ल्यमापन करावे लागेल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, ओमिक्रॉनचे अस्तित्व अद्याप देशात आढळलेले नाही. भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांची कडक तपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. ओमिक्रॉन हा नवा विषाणू आढळल्यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या तसेच लसीकरण यांची व्याप्ती आणखी वाढवा, जिथे संसर्ग वाढला आहे तिथे कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्राने राज्यांना दिल्या.
बंगळुरूमधील दोघांना ओमिक्रॉनची बाधा नाहीदक्षिण आफ्रिकेहून बंगळुरूमध्ये आलेल्या प्रवाशांपैकी दोन जण कोरोनाबाधित असले तरी त्यांना ओमिक्रॉनची नव्हे तर डेल्टा विषाणूची बाधा झाली, असे कोरोना चाचणीतून आढळून आले. त्यामुळे सध्या भारतात ओमिक्रॉॅनने बाधित एकही रुग्ण नाही.
नागरिकांनी घाबरू नये : आयसीएमआर- ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही. ज्यांनी दुसरी लस अद्याप घेतलेली नाही, त्यांनी ती घ्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत राहावे, असे आवाहन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे.- विषाणूत होणाऱ्या परिवर्तनामुळे एखादी साथ आणखी तीव्र होईलच असेही नाही, असे आयसीएमआरमधील साथीच्या रोगांशी संबंधित विभागाचे प्रमुख समीरण पांडा यांनी सांगितले.