ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धोका वाढत असतानाच कर्नाटकातील सरकारी शाळा आणि तेलंगणातील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बॉम्ब फुटला आहे. कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील 59 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच बरोबर तेलंगणातील करीमनगर येथील चालमेडा आनंद राव वैद्यकीय विज्ञान संस्थेत 43 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कर्नाटकातील चिकमंगळुरू येथील सर्वोच्च जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले, की कोणत्याही संक्रमित विषाणूची लक्षणे आढळली नाहीत. चिकमंगळुरूचे उपायुक्त केएन रमेश म्हणाले, घाबरण्याची गरज नाही, कारण वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत आणि एक रुग्णवाहिकाही स्टँडबाय ठेवण्यात आली आहे. दरम्यान, 450 निवासी विद्यार्थ्यांची नोंद असलेली शाळा सील करण्यात आली असून सॅनिटाइझही करण्यात आली आहे. तसेच, संक्रमित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना वसतिगृहाच्या एका भागात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
तसेच, तेलंगणातील बोमक्कल गावातील मेडिकल कॉलेजमध्ये 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त असून अद्याप सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे. डिस्ट्रिक्ट मेडिकल हेल्थ ऑफिसरने रविवार सांगितले की, अद्याप कॉलेजकडून इतर माहिती देणे बाकी आहे. तेलंगणात सोमवारपर्यंत कोरोनाचे एकूण 3 हजार 787 सक्रिय रुग्ण होते. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९९९ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.