आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनच्या सध्यस्थितीवर शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी देशातील ओमाक्रॉनच्या स्थितीसंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच, देशात आतापर्यंत या व्हेरिअंटचे 25 रुग्ण आढळून आले असल्याचे सांगण्यात आले. सर्वात पहिले कर्नाटकात ओमायक्रॉनची लागन झालेले दोन रुग्ण समोर आले होते. (Omicron cases in World)
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, हा प्रकार आतापर्यंत एकूण 59 देशांमध्ये पसरला असून एकूण 2936 रुग्णांची नोंद झाली आहे. 24 नोव्हेंबरला, दक्षिण आफ्रिकेच्या गोटेंग प्रांतात या व्हेरिअंटची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. तसेच 26 नोव्हेंबर रोजी WHO ने याला व्हेरिअंट ऑफ कंसर्न म्हणून घोषित केले.
यूकेमध्ये सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण -एकूण 2, 936 रुग्णांपैकी सर्वाधिक 817 रुग्ण यूकेमध्ये आहेत. तर डेनमार्कमध्ये 796 आणि दक्षिण आफ्रिकेत 431 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय, कॅनडामध्ये 78, अमेरिकेत 71, जर्मनीमध्ये 65, दक्षिण कोरियामध्ये 60, ऑस्ट्रेलियामध्ये 52, झिम्बाब्वेमध्ये 50, फ्रान्समध्ये 42, पोर्तुगालमध्ये 37, नेदरलँडमध्ये 36, नॉर्वेमध्ये 33, घानामध्ये 33 आणि बेल्जियममध्ये 30 रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत आणखी एक रुग्ण - दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेला एक रुग्ण समोर आला आहे. ज्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ती टांझानियाहून परतली होती.
भारतात बदलण्यात आले आहेत अनेक नियम -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर, भारतात ट्रॅव्हल अॅडव्हायजरीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकाराबाबत योग्य मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच, नवे आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल अॅडव्हायजरीही लागू करण्यात आली आहे.