"...आज देशातील नागरिकांकडून आणखी एका गोष्टीसाठी समर्थन मागत आहे, ते म्हणजे जनता कर्फ्यू… अर्थात जनतेसाठी… जनतेकडून स्वतःवर लावण्यात आलेला कर्फ्यू..."
वर्ष 2020च्या सुरुवातीलाच संपूर्ण जगात कोरोना महामारिने हाहाकार माजवायला सुरुवात केली होती. याच काळात भारतासह संपूर्ण जग कोरोनाचा सामना करण्याच्या तयारीला लागले होते. तेव्हा 19 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 135 कोटी देशवासीयांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर 24 तासांसाठी संपूर्ण देश थांबला होता. शहर असो की गाव आणि सोसायटी असो वा कार्यालये सर्व ठिकाणी केवळ शांतता होती. आज या 'जनता कर्फ्यू'ला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
गेल्या वर्षी 30 जानेवारीला भारतात पहिला कोरोनारुग्ण आढळला. तेव्हा, हा आजार नेमका कसा आहे आणि तो केव्हापर्यंत संपेल हे कुणालाही माहीत नव्हते. पाहता पाहता कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले, तेव्हा केंद्र सरकारने कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून सर्वप्रथम 22 मार्च 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले.
या जनता कर्फ्यूमध्ये 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्येकाला आपल्या घरातच राहायचे होते. यावेळी सर्व बाजार, दुकान, सर्वजनिक वाहन, कार्यालये आणि शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले होते. यात केवळ अत्यंत आवश्यक असलेल्या क्षेत्रांतील लोकांनाच कामावर जाण्याची सूट देण्यात आलेली होती.
काय म्हणाले होते मोदी -22 मार्च 2020 रोजी रविवारी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. मात्र, मोदींनी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले होते. या वेळी मोदींनी कोरोनासंदर्भात माहिती देत 22 मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.
करण्यात आले होते खास आवाहन -मोदींनी जनता कर्फ्यूसह जनतेला आणखी एक आवाहन केले होते. 22 मार्चला सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी आपल्या घराच्या बालकनीत उभे राहून दिवा लावत टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे हे आवाहन होते. देशात कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स ना सॅल्यूट करणे, असा या मागचा होतू होता.
मोदींच्या या आवाहनाचा परिणाम संपूर्ण देशावर झाला होता. केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारखी मोठी शहरेच नाही, तर छोट्यातील छोटे गावही या जनता कर्फ्यूचा भाग झाले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी 24 मार्चला पुन्हा जनतेला संबोधित केले. जनता कर्फ्यूचे कोतुक केले. तसेच याच वेळी देशात 21 दिवसांच्या संपूर्ण लॉकडाउनचीही घोषणा केली. म्हणजेच लोकांना पुढचे 21 दिवस आपल्या घरातच राहायचे होते. संपूर्ण देश बंद झाला होता.
आता पुन्हा येतोय कोरोना -देशात जनता कर्फ्यू लागला, तेव्हा कोरोनाचे एकूण 330 रुग्ण होते. तेव्हा हा वेगही मनात धडकी बसवणारा होता. आता एक वर्षांनंतर पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. आता पुन्हा एकाच दिवसात 40 हजारच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. अशात काही राज्यांतील शहरांतही लॉकडाउनचा निर्णय घेतला जात आहे.