भोपाळ - देशात कोरोना महामारीचं मोठं संकट उभं असून अनेक राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अनेक सामाजिक संस्थांसह देशविदेशातून भारतातील विदारक कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं जात आहे. तसेच, मदतीचा हातही पुढे करण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेला आणि गुगलच्या सुंदर पिचई यांनीही कोरोना संकटात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. तर, सैन्य दलाकडूनही देशवासीयांना तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
देशावरील मोठ्या संकटात भारतीय सैन्य दल नेहमीच प्राधान्यक्रमाने मदतीला धावत असतो. आता, कोरोनाच्या संकटातही भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी टँकर एअरलिफ्ट करण्यात येत आहेत. दोन दिवसापूर्वीच सिंगापूरहून 4 टँकर भारतात आणण्यात आले आहेत. तर, देशातील विविध राज्यांतही हवाई वाहतुकीने ऑक्सिजनचा पुरवठा सैन्य दलाने केला आहे. आता, जम्बो कोविड सेंटर उभारणीसाठीही सैन्यदलाने पुढाकार घेतल्याचं दिसून येतंय.
सैन्य दलाने मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात केवळ 48 तासांत 150 बेडचं कोविड आयसोलेशन सेंटर उभारलंय. लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी हे सेंटर उभारण्यात आले असून येथे त्यांच्यावर उपचार होणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आर्मीची मदत मागितली होती. त्यानंतर, सैन्यातील अधिकाऱ्यांनी भोपाळच्या बैरागढ येथील सैन्याच्या तीन ईएमई सेंटरमध्ये 150 बेडचे आयसोलेशन सेंटर उभारले आहे. या सेंटरमधील प्रत्येक बरॅकमध्ये 4 ते 5 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत 6 बेड ठेवण्यात आले आहेत. येथील 150 बेडपैकी 40 बेड हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या सेंटरसाठी 4 डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफ असणार आहे.
दरम्यान, दोन सरकारी डॉक्टरांचेही नियंत्रण या कोविड सेंटरवर असणार आहे. येथे रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास पूर्तता होईल, अशी व्यवस्थाही उभारण्यात आली आहे.