जयपूर – कोरोना व्हायरसने जगातील ७,५०० हून अधिक लोकांचा जीव घेतला आहे तर १ लाख ९० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभव रोखण्यासाठी सरकारकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात येत आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. चीननंतर कोरोनाची दहशत संपूर्ण जगात पसरली आहे.
मात्र या आजारापासून रुग्णांचं संरक्षण करणाऱ्या डॉक्टरांनी स्वत:चा जीव पणाला लावला आहे. यातीलच जयपूरमधील डॉ. प्रकाश केसवानी यांनी आपला अनुभव कथन केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णावर ते उपचार करत आहेत. डॉ. प्रकाश केसवानी यांनी सांगितले की, २ मार्च रोजी एसएमएस रुग्णालयात एका रुग्णाची तपासणी करण्यात आली त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यावेळी माझ्या मनात भीती निर्माण झाली, या आजारावर कोणतंही औषध नाही. मात्र हिंमत दाखवत कोरोनाच्या रुग्णाला बरं करण्याचा निर्धार केला. दुसरीकडे माझ्या या कामामुळे घरातलेही चिंतेत आले. त्यानंतर जीवाची कोणती पर्वा न करता मी डॉ. सुधीर भंडारी यांच्यासोबत जागतिक मार्गदर्शक सूचनेप्रमाणे या रुग्णावर उपचार सुरु केले.
एकीकडे कुटुंबातील नातेवाईक चिंताग्रस्त होते. मी जसं संध्याकाळी घरी पोहचलो त्यावेळी माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या बातम्यांमुळे त्यांची चिंता आणखी वाढत होती. जरा सांभाळून काम करा अशी विनवणी घरातले करत होते. त्यावेळी मी त्यांना समजावलं, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तुम्ही माझ्याशी मास्क घालून संवाद साधू शकता. अशा परिस्थितीत अनेक खबरदारी घेण्यात आली. हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर मी वेगळ्या रुममध्ये राहत होतो. जेवण पाणी त्याच रुममध्ये होत असे. रुग्णांनी डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्यांना वाचवणं हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे. अशावेळी माझ्या घरच्यांनी मला साथ दिली. अभ्यासपूर्ण उपचारामुळे आमच्या टीमने औषधांद्वारे कोरोना रुग्णाला बरं केलं असं डॉ. प्रकाश केसवानी यांनी सांगितले.