नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत होती. परंतु आता कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात २,८१,३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३,७८,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत थोडी दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत वैद्यकीय सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जीव गमावावा लागत आहे. Corona Virus Rahul Gandhi Slams PM Modi and Ventilators Issued under PM Cares Fund
पीएम केअर फंड अंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटर देण्यात आले होते, परंतु व्हेंटिलेटरमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. य़ाच दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात बरीच समानता असल्याचं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पीएम केअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात, गरजेच्या वेळी दोघांनाही शोधणं कठीण आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
"लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब"
राहुल गांधी यांनी कोरोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब" असल्याचं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. "लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. याआधी देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचं म्हणत मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखं गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहचवण्यात यावी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह हे गंगा नदीमध्ये वाहत असलेले आढळून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राहुल यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या जोरदार टीका केली आहे. "जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है" असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी गंगा घाटावर पूजा केली होती. त्यावेळेस त्यांनी माँ गंगेने बोलवलं असं म्हटलं होतं. यावरून आता सध्या परिस्थितीचं उदाहरण देत काँग्रेसने टोला लगावला आहे, राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये एका बातमीचा देखील फोटो शेअर केला आहे.