देशभरात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र याआधी धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. पुन्हा एकदा देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात तिप्पट रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या 24 तासांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर देशात 324 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 22 फेब्रुवारी रोजी 95 प्रकरणे नोंदवण्यात आली होती, त्यानंतर प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याचवेळी, शुक्रवारी दररोज नोंदवलेला आकडा 300 होता, जो आज 324 वर पोहोचला आहे. या नवीन प्रकरणांची नोंद झाल्यानंतर देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या 2 हजार 791 वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू
कोरोनाच्या वाढत्या आकड्याने सरकार आणि जनतेची चिंता आणखी वाढवली आहे. यापूर्वी कोरोनामुळे तीन जणांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. त्याच वेळी, या साथीच्या आजाराने मृतांची संख्या आता 5 लाख 30 हजार 775 वर पोहोचली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात 2 आणि केरळमध्ये 1 मृत्यू झाला. त्याचवेळी, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4,46,87,820 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, भारतातील देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220.63 कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतात, 7 ऑगस्ट 2020 रोजी, कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांवर गेली. संसर्गाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 90 लाखांवर गेली होती. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"