नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,419 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 159 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,74,111 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
बिहारमध्ये एका मृत महिलेला कोरोना लस दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्ती कोरोना लसीचा डोस कसा घेऊ शकते हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. कौशल्या देवी असं महिलेचं नाव असून तिने 26 एप्रिल 2021 रोजी छपरा येथील रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. मृत्यूच्या तीन महिन्यांनंतर आता 9 डिसेंबर 2021 रोजी रजिस्टर्ड मोबाईल नंबर कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला आहे. यामुळे कुटुंबीयांना आता मोठा धक्का बसला आहे. महिलेच्या मुलाने हा प्रकार सांगितला आहे.
"कोरोना लसीचं प्रमाणपत्र देखील झालं डाऊनलोड"
"आईच्या मृत्यूला तीन महिने झाल्यानंतर आता कोरोना डोस घेतल्याचा मेसेज आल्याने घरातील सर्व मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिने लसीचा पहिला डोस घेतला होता. पण त्यानंतर काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. त्याला आता तीन महिने पूर्ण झाल्यावर डोस घेतल्याचा मेसेज आला आहे. मेसेजमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कोरोना लसीचं प्रमाणपत्र देखील डाऊनलोड झालं आहे" अशी माहिती महिलेच्या मुलाने दिली आहे. याआधी देखील अशा अनेक घटना या समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.