लुधियाना – संपूर्ण जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचे देशात १४७ रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक ४२ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाची लक्षण आढळल्यास तातडीनं अशा रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कोरोनाची लागण झालेले काही रुग्ण बरेदेखील झाले आहेत.
पंजाबमधील लुधियानात कोरोनाचे 167 संशयित बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील कोरोना संशयित मोठ्या संख्येने बेपत्ता झाल्यामुळे प्रशासनाचेही खडबडून जागं झालं आहे. बेपत्ता 29 संशयिताची माहिती मिळाली असून अन्य 167 कोरोना संशयितांचा शोध अद्याप लागला नाही.
पंजाबमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकतीच परदेश दौर्यावरुन परत आलेल्या नागरिकांची यादी देण्यात आली. आता आरोग्य विभाग अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरुन कोरोना संसर्ग झाल्यास त्यांना एकाकी ठेवता येईल. शहरातील सिव्हिल सर्जन राजेश कुमार बग्गा यांनी सांगितले की, परदेशातून येणार्या लोकांचा शोध घेण्यासाठी दोन टीमची स्थापना केली आहे. 119 जणांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. त्यांना आतापर्यंत 12 लोक सापडले आहेत. आरोग्य विभागाच्या दुसऱ्या टीमला सुमारे 77 जणांचा शोध घेण्यास सांगितले आहे.
सिव्हिल सर्जन कुमार म्हणाले, आरोग्य विभागाच्या पथकाला 17 संशयित आढळले आहेत. उर्वरित 167 लोक अद्याप लुधियानामध्ये बेपत्ता आहेत. आतापर्यंत या संशयितांविषयी माहिती न मिळण्याचे एक कारण म्हणजे पासपोर्टमधील चुकीचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक असू शकतो. पत्ते आणि फोन नंबर बदलले आहेत. आमचे कार्यसंघ सक्रिय आहेत आणि त्यांचा शोध घेत आहेत. ते लवकरच सापडतील असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, व्हायरसचा धोका लक्षात घेता लुधियाना रेल्वे स्थानकाच्या आसपासचा परिसर स्वच्छ केला जात आहे. याआधी 14 मार्च रोजी पंजाबमधून धक्कादायक माहिती समोर आली होती की आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणारे 335 लोक बेपत्ता आहेत असं सांगण्यात आलं होतं. पंजाब सरकारने बाहेरून परत आलेल्या 335 लोकांची तपासणी केली नाही आणि आता ते कोठे आहेत याचीही माहिती नाही.