नवी दिल्ली : दुबईहून तेलंगणात आलेल्या तसेच सिंगापूरहून दिल्लीत आलेल्या दोन भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यातच आता आग्र्यात देखील सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झालं असल्याची सॅम्पल टेस्टमध्ये आढळून आले आहे. दिल्लीमधील कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णाच्या संपर्कात असल्यामुळे या सहाही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने देखील आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
दुबईहून तेलंगणात आलेल्या तसेच सिंगापूरहून दिल्लीत आलेल्या अशा दोघा भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले होते. तसेच राजस्थानात आलेल्या इटालियन नागरिकालाही संसर्ग झाला होता. त्या सर्वांना रुग्णालयांत नेले असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. यापूर्वी केरळमध्ये करोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले होते.
कोरोना व्हायरसच्या आजारामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीत कोरोनाचे रुग्ण बाहेर जाणार नाहीत आणि त्यांना एकांतवासात वा रुग्णालयातच ठेवावे, अशा सूचना आहेत.
कोरोना व्हायरसच्या आजारामुळे आतापर्यंत तीन हजार बळी घेतले आहे. त्यापैकी 2912 मृत्यू चीनमधील असून, अन्य देशांत मरण पावलेल्यांची संख्या 157 झाली आहे. याशिवाय जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 90 हजारांपर्यंत पोहोचली आहे. चीनपाठोपाठ कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरिया व इराणमध्ये आहेत. कोरियात 500 रुग्ण असून, 28 जण मरण पावले आहेत. इराणच्या उपराष्ट्रपती व आरोग्यमंत्री यांनाही याची लागण झाली असून, त्या देशाच्या प्रमुखांच्या सल्लागाराचा सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. तिथे आतापर्यंत 66 जण मरण पावले आहेत. अमेरिकेतही दोन जणांचा बळी घेतला आहे.
रशिया, जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, इंडोनेशिया, ब्रिटन युरोपियन युनियन अशा किमान 60 देशांत कोरोना फैलावला आहे. त्यामुळे या सर्व देशांत अनेक निर्बंध घालण्यात आले असून, तेथील जवळपास सर्व सार्वजनिक समारंभ, क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.