मुंबई - देशामध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील हजारो धनिक लोक देश सोडून कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या देशांच्या दिशेने धाव घेत आहेत. देशाबाहेर जात असलेल्या भारतीयांकडूनसंयुक्त अरब अमिरातीला (यूएई) प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे भारतातूनसंयुक्त अरब अमिरातींकडे जाणाऱ्या विमानांच्या तिकीटदरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच यूएईकडे जाणाऱ्या खाजगी विमानांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ( Spread of coronavirus in india, many rich Indians fled abroad paying ten times the fare)
यूएईला जात असलेली विमानसेवा बंद होण्यापूर्वी येथे पोहोचण्यासाठी लोकांनी धावपळ सुरू केलेली आहे. दरम्यान, भारतात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि त्यानंतर लोकांनी यूएईच्या दिशेने सुरू केलेले पलायन यामुळे यूएईने रविवारपासून भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
वृत्तसंस्थांनी केलेल्या दाव्यानुसार यूएईमधून भारताकडे येणारा विमान मार्ग सर्वाधिक वाहतूक असलेल्या विमानमार्गांपैकी एक आहे. विमानांच्या तिकिटांची तुलना करणाऱ्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार मुंबईतून दुबईला जाणाऱ्या कमर्शियल फ्लाइटच्या तिकिटाचे दर हे ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सर्वसामान्य दरांपेक्षा हे दर दहा पटींनी अधिक आहेत. तर दिल्लीतून दुबईला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर हे ५० हजारांवर पोहोचले आहेत. हे दर नियमित दरांपेक्षा पाच पट अधिक आहेत. मात्र निर्बंधांची घोषणा करण्यात आल्यानंतर रविवारपासून कुठल्याही विमानाचे तिकीट उपलब्ध नाही आहे.
दरम्यान, खाजगी विमानांसाठीची मागणीही वाढली आहे. मुंबईतून दुबईला जाणाऱ्या १३ सिटर विमानाचा खर्च ३८ हजार डॉलर आहे. तर सिटर विमानासाठीचा खर्च ३८ हजार डॉलर एवढा आहे. यूएई आणि भारतामध्ये गेल्या आठवड्यात ३०० विमान फेऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, भारत आणि अन्य देशांमधून यूएईत येणाऱ्या लोकांना १४ दिवस क्वारेंटाइन राहावे लागेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.