नवी दिल्ली : झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य आजाराला घाबरण्याची गरज नसून त्याऐवजी काळजी घेतल्यास त्याचा प्रतिकार करणे सहज शक्य आहे, अशी प्रतिक्रिया एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे. चीनमध्ये अचानक अनेक रुग्णांची संख्या समोर आल्याने दहशत पसरली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांची प्रकृती अगोदरपासूनच बिघडलेली होती. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणारांना कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे अशा रुग्णांच्या मृत्यूचा धोका अधिक असतो, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. कोरोनाचे संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनाच या आजाराचा संसर्ग होतो. त्यामुळे प्रत्येकाला हा संसर्ग लगेच होईल, असे नाही. त्यामुळे दिल्लीतील तीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण दिल्लीत या आजाराचे संक्रमण होईल, असे समजणेही चुकीचे असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले. लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे या दोघांमध्येही आजाराचे संक्रमण होण्याचा धोका असतो. त्यामुळेच लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची काळजी घ्यावी.होळी घरातच साजरी कराहोळीसारख्या सणात एखादी संक्रमित व्यक्ती सहभागी झाली तर आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरातच हा सण साजरा करावा, असे आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केले.