बंगळुरू - चीनसह अनेक देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे भारताही कोरोनाबाबत खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने राजधानी बंगळुरूमध्ये कोरोनाच्या परिस्थितीबाबत विशेष बैठक घेतली होती. या बैठकीनंतर सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी बंगळुरू आणि मंगळुरू येथे दोन रुग्णालये तयार ठेवण्यास सांगितले आहे. या रुग्णालयांमध्ये बंगळुरूमधील बौरिंग रुग्णालय आणि मंगळुरूमधील वेनलोक रुग्णालयाच्या नावांचा समावेश आहे. त्याशिवाय सरकारकडून लोकांसाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाकडून लागू करण्यात आलेल्या सूचनांमध्ये बंद थिएटरमध्ये चित्रपट पाहायचा असेल तर प्रेक्षकांना मास्क लावणे अनिवार्य आहे. त्याशिवाय शाळा आणि कॉलेजमध्येही मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय शाळा आणि कॉलेजमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था आणि सर्वांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. जर शाळा आणि कॉलेजमध्ये कुणाचे लसीकरण झालेले नसेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल. एवढेच नाही तर नव्या वर्षामध्ये रेस्टॉरंटमध्ये मास्क वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याशिवाय बारमध्ये बार टेंडरने मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच त्याचे लसीकरण झालेले असणेही आवश्यक आहे.
सरकारकडून लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार बंगळुरूमधील एमजी रोडवर होणाऱ्या उत्सवादरम्यानसुद्धा मास्क वापरण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. त्याशिवाय शहरामध्ये नव्यावर्षाच्या जल्लोषासाठी रात्री १ वाजेपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे.
कोरोनाबाबत कर्नाटकच्या बेळगाव येथे सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत मार्गदर्शक सूचनांची घोषणा करण्यात आली. आरोग्यमंत्री के. सुधाकर आणि महसूलमंत्री आर. अशोक यांनी या नव्या अटींबाबत माहिती दिली. तसेच संध्याकाळपर्यंत या संदर्भातील सर्व आदेश प्रसिद्ध केले जातील, असे सांगितले.