नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्या धोकादायक लाटेनंतर आता तिसर्या लाटेबाबतही विविध चर्चा सुरू आहे. तसेच, कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Report) दिलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, तिसरी लाट दुसर्या लाटेप्रमाणे प्राणघातक ठरू शकते. तिसऱ्या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (third covid wave could be as severe as second, SBI report)
आंतरराष्ट्रीय अनुभवांचा संदर्भ देताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या Ecowrap रिपोर्टने मूल्यांकन केले आहे की, चांगल्या तयारीमुळे महामारीच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच, इतर मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सरासरी 108 दिवस आणि तिसरी लाट 98 दिवसांपर्यंत राहू शकते, असेही रिपोर्ट म्हटले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरूस्टेट बँक ऑफ इंडियाचा हा रिपोर्ट अशा वेळी आला आहे की, देश तिसऱ्या लाटेच्या तयारीत व्यस्त आहे. कोरोना लसीकरणाची गती वाढविण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वैद्यकीय उपकरणेही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत. दुसर्या लाटेचा परिणाम पाहता केवळ एका महिन्यात 90.3 लाख कोरोना प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बहुतेक सर्व बाधित राज्यांमधील कोरोना परिस्थिती सुधारली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे.
'लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुप्पट तयारी'एकीकडे आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता तज्ज्ञांकडून तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम लहान मुलांवर जाणवू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लहान मुलांचे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी दुपटीपेक्षाही अधिक तयारी करण्यात आल्याचे सांगत सरकारने आश्वासन दिले आहे. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लक्षणे नसलेल्या केसेस आहेत. तर दुसरीकडे गंभीर केसेस कमी आहेत. कोरोना विषाणूने आपले रूप बदलले तर लहान मुलांसाठी धोका वाढू शकतो, असं मत नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी व्यक्त केले. लहान मुलांच्या रक्षणासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या केल्याच जातील. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. त्यामुळे २ ते ३ टक्के मुलांनाच रुग्णालयाची गरज भासते, असेही ते म्हणाले.