पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील मांजरी येथे असलेल्या सिरम इन्स्टिटयूटला भेट दिली. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसच्या निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलेले होते. या पत्रकार परिषदेत पुनावाला यांनी कोरोनावरची लस सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार असून तिचे वितरण प्रथम भारतात केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
सिरमचे आदर पुनावाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.त्यांना कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान लसीच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत समाधानी आहे.
कोरोनावरील कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचे लक्ष आहे.लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी तयारी केली जात आहे. जुलै 2021 ते 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे. लसीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि ती सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार आहे असेही पूनावाला म्हणाले.
कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित...
प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लसीमुळे स्वयंसेवकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण शून्य आहे. तसेच लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढत असून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता ६० टक्क्यांनी कमी झाली आहे असेही यावेळी पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्यक्ष स्थिती जाणून न घेता सामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण न करण्याचे आवाहन...
भारतानंतर मुख्यत: ‘कोव्हॅक्स’अंतर्गत असलेल्या आफ्रिकन देशांना लस वितरीत होईल. अॅस्ट्रॉझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून ब्रिटन आणि युरोपातील देशांचे नियोजन केले जाणार आहे. तर सिरमकडून भारत आणि कोव्हॅक्स देशांना प्राधान्य असेल. स्वस्त दरात आणि मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी, यासाठी संपुर्ण जग भारताकडे डोळे लावून बसले आहे. जगात लागणाऱ्या एकुण लसींपैकी ५० ते ६० टक्के लसी भारतात तयार होतात. आत्मनिर्भर भारत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची तयारी ठेवली आहे. जगभरातून लसींच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सर्व उत्पादक, सरकार आणि माध्यमांनी प्रत्यक्ष स्थिती जाणून न घेता सामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करू नये. सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या मनात विनाकारण शंका निर्माण होणे योग्य नाही, असे आवाहनही त्यांनी केले.