पुणे : भारतात आपत्कालीन स्थितीत लसीकरणासाठी फायझर कंपनीने सरकारकडे मागील आठवड्यातच परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ सिरम इन्स्टिट्युटनेही परवानगी मागितली असल्याने आता कोणत्या लसीला पहिल्यांदा परवानगी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. कोविशिल्ड लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठविता येऊ शकते. तर फायझर लसीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमान लागते. या लसीसाठी साठवणुक यंत्रणा उभी करणे भारतासाठी सध्यातरी आव्हानात्मक आहे. त्यामुळे ‘कोविशिल्ड’ या लसीलाच केंद्र सरकारकडूनही अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.
फायझर या औषध निर्माता कंपनीच्या लसीची परिणामकारकता ९५ टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ब्रिटनसह बहारीनमध्ये या लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. तर अमेरिकेसह भारतात लसीकरणासाठी परवानगी मागण्यात आली आहे. भारतामध्ये परवानगी मागणी फायझर ही पहिली कंपनी ठरली आहे. त्यापाठोपाठ सिरमनेही औधष महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. कोविशिल्ड लसीची परिणामकारकताही ९० टक्के असल्याचा दावा अॅस्ट्राझेनेका कंपनीने केला आहे. त्यामुळे सध्या दोन्ही लसींमध्ये एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. पण फायझरसाठी भारतातील लसीकरण आव्हानात्मक ठरणार आहे.
भारतामध्ये लसींच्या साठवणुक व वितरणामध्ये या लसीला मर्यादा येऊ शकतात. ही लस उणे ७० अंश सेल्सिअस तापमानातच टिकाव धरू शकते. तर सिरमच्या लसीला २ ते ८ अंश सेल्सिअस तापमान पुरेसे आहे. या लसीची साठवणुक व वितरण करणे भारताच्यादृष्टीने फारसे कठीण नाही. भारतामध्ये लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जातो. त्यासाठीची पुरेशी सज्जता आहे. पण फायझर लसीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल. महानगरांच्या ठिकाणीच काही प्रमाणात ही व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारकडूनही सिरमच्या लसीलाच अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते.----------आपल्याकडे लस साठवणुक, शीतकरणाच्या सुविधा आहेत. फायझर, मॉडर्नासह अन्य काही लशींना वेगळी साठवणुक लागत असेल तर ते आपल्यासाठी आव्हानात्मक असेल. त्यामुळे आपल्या देशात विकसित असलेल्या लशींचा पहिल्यांदा वापर करावा, असे सरकारने ठरविले आहे. याचा अर्थ असा नाही की अन्य लसींना परवानगी मिळणार नाही.- डॉ. रमण गंगाखेडकर, माजी प्रमुख, साथरोग व संसर्गजन्य आजार विभाग, आयसीएमआर-----------