नवी दिल्लीकोरोनाची लस विकसीत करण्यात भारतीय शास्त्रज्ञ उल्लेखनीय काम करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. संपूर्ण जगात विकसीत होत असलेल्या एकूण २५० कोरोना लशींपैकी ३० लशींची निर्मिती एकट्या भारतात होत असून कोरोनावरील लशीच्या उत्पादनात भारत अग्रेसर असल्याचं डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशाने दोन पातळ्यांवर काम केलं. कोरोनाच्या विरोधात एका बाजूला डॉक्टर्स, नर्स आणि इतर कोविड योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवण्यासाठी परिश्रम घेतले. तर दुसरीकडे देशाच्या वैज्ञानिकांनी आपली जबाबदारी ओळखून लशीच्या निर्मितीसाठी दिवसरात्र एक केली. हे एक ऐतिहासिक पर्व आहे. या कामाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, असंही हर्षवर्धन म्हणाले.
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या विषाणूलाही भारताने आयसोलेट करण्यात यश मिळवलं आहे, असा दावा हर्षवर्धन यांनी केला आहे. विषाणूला स्टोअर करुन भारताने बायो रिपॉजिट्री तयार करण्यातही यश मिळवलं जेणेकरुन आगामी काळात या विषाणूबाबत विद्यार्थी आणि फार्मा कंपन्यांना अभ्यास करता येईल.
भारतात सध्या एकूण ३० लशींवर काम सुरू आहे. यात विविध लशींच्या विविध टप्प्यात चाचण्या सुरू आहेत. यातील दोन लशींना तर आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देखील मिळाली आहे, असं हर्षवर्धन म्हणाले.