नवी दिल्ली : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी कोरोना व्हायरसबाबत मोठे विधान केले आहे. कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून ही महामारी काही देशांचे षड्यंत्र आहे. ते एक जैविक युद्ध होते, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. सोमवारी येथे महाराष्ट्रातील एका धार्मिक कार्यक्रमाला संबोधित करताना रविशंकर म्हणाले की, हे बरोबर सिद्ध झाले आहे, कारण मोठे देश आता म्हणत आहेत की कोरोनाव्हायरसविरूद्ध लस फारशी उपयुक्त ठरत नाहीत.
संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसशी लढा द्यावा लागला. लोकांना दोन वर्षे घरातच राहावे लागले. कोरोनाच्या प्रभावावर मी त्यावेळी म्हणालो होतो की, हा आजार नैसर्गिक नाही. हे काही देश आणि लोकांचे षड्यंत्र आहे, हे जैविक युद्ध आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. तसेच, माझ्या शिष्यांनी देखील मला असे न बोलण्याचा सल्ला दिला होता, कारण यामुळे वाद निर्माण होईल. पण, मी जे म्हणत होतो ते आता सिद्ध झाले आहे, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.
याचबरोबर, जे मोठे देश कोरोना व्हायरसची लस बनवत आहेत, ते म्हणत आहेत की ही लस पाहिजे तितकी प्रभावी नाही. त्यामुळे संसर्गाचा प्रसार थांबत नाही. देशाची योग आणि आयुर्वेदावर श्रद्धा असायला हवी, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. तसेच, हर्बल आणि आयुर्वेदिक औषधे वापरली जावीत, असे मला वाटले आणि त्यासाठी एनएओक्यू 19 तयार केली आणि 14 हॉस्पिटलमध्ये त्याची चाचणी करण्यात आली, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.
याशिवाय, एनएओक्यू 19 कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी औषध म्हणून काम करत आहे. हे परदेशातील अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये पाठवण्यात आले आणि लोकांना समजले की, हे औषध कोरोना व्हायरसला रोखण्यात यशस्वी ठरेल. आपल्या देशाच्या योग आणि आयुर्वेदावर आपली श्रद्धा असली पाहिजे, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.