कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून, त्यामुळे तेथील राज्य सरकारने तातडीने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या राज्यात उद्या, ३ जानेवारीपासून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्यात येतील. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढलेल्या दिल्ली, मुंबईहून पश्चिम बंगालला आठवड्यातून केवळ दोन दिवसच विमानसेवेस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली आहे. विमानसेवेबाबतचा आदेश मंगळवारपासून अंमलात येईल.
पश्चिम बंगालचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी नागरिकांनी घाबरू नये. सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वैद्यकीय व्यवस्थापनासाठी वेबिनारओमायक्रॉनच्या संसर्गाला रोखण्याकरिता वैद्यकीय उपचारांच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने एम्सच्या सहकार्याने मंगळवारपासून १९ जानेवारीपर्यंत वेबिनारचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सरकारी व खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करा : सोनिया गांधीकोरोनाचा विशेषत: ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता वैद्यकीय यंत्रणा अधिक मजबूत करण्याची सूचना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना दूरध्वनी करून केली. राज्यातील वैद्यकीय यंत्रणेच्या सज्जतेची बघेल यांनी सोनिया गांधींना सविस्तर माहिती दिली.