नवी दिल्ली - जगभरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना नेमका कधी जाईल, असा प्रश्न प्रत्येकाल सतावत आहे. कोरोनासोबत जगणं सुरू आहे, पण ते तितकच कठिणही आहे. त्यामुळे, कोरोनाला हद्दपार करुन पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे आपला दिनक्रम सुरू व्हावा, असे लोकांना वाटते. मात्र, अद्याप ते शक्यच नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात बोलताना WHO चे प्रमुख टेड्रोस एडहानॉम गेब्रयेसिस यांनी अंदाज व्यक्त केला आहे. साधारपणे 2 वर्षात या व्हायरसचा प्रभाव संपुष्टात येईल, असे गेब्रयेसिस यांनी म्हटलंय. त्यासाठी, जगातील सर्वच देशांनी एकत्र येऊन लसीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केलंय.
ट्रोडोस यांनी कोरोना व्हायरसची तुलना 1918 सालच्या स्पेनिश फ्लूसोबत केली आहे. जेनिव्हा येथील एका परिषदेत बोलताना ट्रेड्रोस यांनी कोरोनाचं संकट आणखी किती दिवस राहिल याचेही भाकित केले. सन 1918 साली आलेल्या स्पेनिश फ्लूचा नायनाट होण्यास 2 वर्षांचा कालावधी लागला होता. सध्याच्या परिस्थितीत तंत्रज्ञान व कनेक्टिव्हीटीमुळे व्हायरस लवकर पसरत आहे. आपण एकमेकांसोबत जोडले गेलो आहोत, एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे, हा व्हायरस वेगाने पसरत आहे. मात्र, कोरोनाला थांबविण्याचं तंत्रज्ञान आणि ज्ञानही आपल्याकडे आहे. जागतिकीकरण, संपर्कप्रणाली आणि मित्रत्वामुळे थोडं नुकसान आहे, पण त्यामुळेच उच्चतम तंत्रज्ञानाचा फायदाही होत आहे, असे ट्रेडोस यांनी सांगितले.
आपल्याकडील उपलब्ध साधन-सामुग्री व तंत्रज्ञानाचा वापर करुन आपण लवकरात लवकरच लस शोधू शकतो, असा आशावाद आहे. त्यामुळेच, 1918 च्या फ्लूपेक्षाही कमी कालावधीत आपण कोरोना समूळ नष्ट करु शकतो, असेही टेड्रोस यांनी म्हटलं. इतिहासात डोकावून पाहिल्यास सर्वात धोकादायक आजार हा स्पेनिश प्लू होता. त्यामध्ये 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. तर, जवळपास 50 कोटी नागरिकांना याची बाधा झाली होती. या रोगाचा पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला होता, त्यानंतर युरोप आणि जगभरात याचा पसार झाला.
दरम्यान, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.3 कोटींवर पोहोचली असून आत्तापर्यंत 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी १४ हजार १६१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० इतकी झाली आहे. मात्र, दिवसभरात ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख ७० हजार ८७३ वर पोहचली आहे. सध्या राज्यभरात १ लाख ६४ हजार ५६२ अँक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोनाची लस सर्वात आधी रशियाने निर्माण केली आहे. याची प्राथमिक ट्रायल झाल्यानंतर आता तब्बल ४० हजार लोकांवर परिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे परिक्षण पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. याआधीही Fontanka न्यूज एजेंसीनं दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या आरोग्यमंत्रालयानं ३८ लोकांवर चाचणी केल्यानंतर मंजूरी दिली आहे. रशियाने तयार केलेली कोरोनावरील लस स्पूतनिक व्ही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेक भारतीय कंपन्या सरसावल्या आहेत. भारतीय कंपन्यांनी रशियन संचालक गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) यांच्यकडे लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्यांविषयी माहिती देण्यास सांगितले आहे.