लोकमत न्यूज नेटवर्क :
जगातील विविध देशांमध्ये कोरोनाची मागे हटण्याची काही चिन्हे नाहीत. त्यातील काही देश तर असे आहेत की ज्यांच्या निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अशा देशांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. काही देशांनी तर अनलॉकच्या आपल्या प्रयत्नांना पुन्हा कुलूप ठोकले आहे.
इंग्लंडमध्ये रोज ३० हजार बाधित
- इंग्लंडमध्ये ५१ टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. एक डोस घेतलेल्यांची संख्या ६८ टक्के आहे.
- तेथील सरकारने १९ जुलैपासून अनेक ठिकाणी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णयही घेतला.
- परंतु कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.
- गेल्याच आठवड्यात कोरोनाचे ३५ हजार रुग्ण आढळले. तेथील आरोग्य मंत्रालयाने लॉकडाउन शिथिल न करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.
इस्रायलमध्ये पाच क्षेत्र धोक्याचे
- जूनमध्ये इस्रायलने मास्कपासून मुक्ती मिळवणारा देश म्हणून मान मिळवला होता.
- तेथे ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर ६६% लोकांचे एकदा लसीकरण झाले आहे.
- परंतु निर्बंध सैल झाल्यानंतर इस्रायलमध्ये रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
- गेल्या तीन दिवसांत सक्रिय रुग्णांचा आकडा ४ हजारांहून अधिक झाला आहे. संसर्गाचे प्रमाण अधिक असलेल्या पाच भागांना धोक्याचे क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
स्पेनमध्ये तरुणांवर अधिक परिणाम
- स्पेनमध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे.
- २० ते २९ वयोगटातील व ज्यांनी लस घेतलेली नाही अशा तरुणांमध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक आहे.
- पॉझिटिव्हिटी रेटही वाढत आहे. स्पेनमध्ये ४५ टक्क्यांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.
- गेल्या आठवड्यात कोरोनाने तेथे ३७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तेथे सतर्कतेचे आदेश देण्यात आले.
अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटची दहशत
- अमेरिकेत आतापर्यंत ४९ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. ७७ टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे.
- मात्र, असे असले तरी आता अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे.
- गेल्याच आठवड्यात अमेरिकेत कोरोनाच्या १९ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भारतातील सद्य:स्थिती
- दुसरी लाट ओसरल्याने अनलॉकची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच यासंदर्भात चिंता व्यक्त केली. तिसऱ्या लाटेचा धोका अटळ असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
- देशात ३८ कोटी लोकांचे लसीकरण झाले असून त्यापैकी केवळ पाच टक्के लोकांचेच पूर्ण लसीकरण झाले आहे.