नवी दिल्ली - देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून रुग्णालये रुग्णांच्या संख्येनं भरली आहेत. दुसरीकडे ऑक्सिजन, रेमेडीसीवीर आणि वैद्यकीय स्टाफची कमतरता जाणवत आहे. या संकटाशी देश धैर्याने सामना करत आहे. मात्र, अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि नेतेमंडळी हतबल झाल्याचं पाहायाल मिळत आहे. विशेष म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही ट्विटरवरुन मदत मागावी लागली, एवढी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं बेड मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना सहजासहजी मदत मिळत नाही. त्यामुळे, स्थानिक नेतेमंडळींशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र, नेतेमंडळींनाही मदत शक्य होत नाही. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपलं ट्विटर अकाऊंट सर्वांसाठी खुलं केलंय. लोकांच्या मदतीसाठीचं ट्विट ते आपल्या अकाऊंटवरुन करत आहेत.
अब्दुल्ला यांच्याकडे मदतीसाठी अनेकांचे मेसेजेस येत आहेत. त्यापैकी, गौर सिटी नोएडा येथील एका युवकाच्या मामांना इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरची गरज आहे. कोविड पॉझिटीव्ह असलेल्या या रुग्णासाठी डॉक्टर उपलब्ध होतील का? असा प्रश्न अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन विचारला होता. तसेच, संबंधित व्यक्तीचा नंबरही शेअर केला होता. त्यानंतर, काही वेळातच पीडित रुग्णास मदत मिळाली आहे. त्यानंतरही, अब्दुल्ला यांनी मदत मिळाल्याचे कळवत आभार व्यक्त केले आहे.