नवी दिल्ली : जगातील सुमारे देशांत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या शनिवारी ६ लाख २१ हजारांवर गेली असून आतापर्यंत २८ हजार ६७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख, ३७ हजार रुग्ण कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत आणि ४ लाख, ५९ हजार जणांवर अद्यापही विविध देशांमध्ये उपचार सुरू आहेत.
ब्रिटनमध्ये मृतांच्या संख्येत शनिवारी अचानक वाढ झाली. शुक्रवारी तेथील आतापर्यंतच्या मृतांचा आकडा ७५९ होता तो आज १,०१९ एवढा झाला आहे. अमेरिकेत या आजाराचे १ लाख ५ हजार रुग्ण असून तेथील मृतांची संख्या १,७१७ एवढी झाली आहे. एका दिवसांत तिथे सुमारे ९०० नवे रुग्ण आढळले.
इटलीमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या वाढतच चालली आहे. त्या देशात आतापर्यंत मृतांचा आकडा सुमारे ९ हजार १५० असून रुग्णांची संख्या ८६ हजार ५०० च्या वर गेली आहे.
इराणमध्ये (एकूण रुग्ण - ३५,५००, मृत २,५००) आणि फ्रान्स (एकूण रुग्ण - ३३०००, मृत २०००) या देशांमध्येही कोरोनाची दहशत कायम असल्याचे जागतिक आरोग्य संघटने (डब्लूएचआो) च्या संकेतस्थळावरील माहितीवरून दिसते.
डब्लूएचओने संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३३ वर गेली आहे. त्यात नव्या रुग्णांची ४६ आहे. आणि भारतात आतापर्यंत या आजाराने २० बळी घेतले आहे. स्पेनमध्येही कोरोनाचा हाहाकार सुरू असून, तेथे आतापर्यंत ७२ हजार, २५० जणांना लागण झाली आहे.