नवी दिल्ली : भारतात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३७,५६६ रुग्ण आढळले, तर ९०७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या १०२ दिवसांत प्रथमच नवे रुग्ण ४० हजारांच्या खाली आले आहेत, तर सलग दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या एक हजाराच्या आत राहिली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. कोरोनामुळे आतापर्यंत वरील ९०७ जणांसह एकूण ३,९७,६३७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार एकूण ३२.९० कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन ५,५२,६५९ झाली आहे. एकूण रुग्णांच्या संख्येत हे रुग्ण १.८२ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढून ९६.८७ टक्क्यांवर गेली आहे. २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत २०,३३५ ने घट झाली आहे. सलग ४७ व्या दिवशी नव्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे.