हरीश गुप्ता - नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील देशव्यापी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात झाली. मात्र, ९ मेपर्यंत लसीकरणाचा वेग तब्बल ४२ टक्क्यांनी घसरल्याचे वास्तव समोर आले आहे. एप्रिल महिन्यात प्रतिदिन २९ लाख ३३ हजार लोकांना लसीच्या मात्रा दिल्या जात होत्या. परंतु मे महिन्यात हेच प्रमाण प्रतिदिन १७ लाखांपर्यंत आले आहे. याच गतीने १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार असेल तर संपूर्ण लसीकरणासाठी भारताला ३० महिने लागतील. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांपुढील
नागरिकांचे लसीकरण हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्या देशात ९० कोटी एवढी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करताना प्रतिदिन ५० लाख लोकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु ११ एप्रिलचा दिवस वगळता एवढ्या प्रमाणात लसीकरण होऊ शकले नाही. ११ एप्रिल रोजी देशभरात ४० लाख लोकांचे लसीकरण झाले होते. एप्रिल महिन्यात लसीकरणाचा वेग चांगला होता. परंतु मे महिन्यात त्यात घसरण झाल्याचे आढळून आली आहे. १ ते ९ मे या दरम्यान प्रतिदिन १२ लाख ४५ हजार लस मात्रा दिल्या गेल्याचे प्राप्त आकडेवारीतून निदर्शनास येते. याच गतीने लसीकरण झाल्यास ९० कोटी लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होण्यास ३० महिने लागू शकतात.
तूर्तास लसींचा तुटवडा असल्याने असे होत आहे. एरव्ही लसीकरणाचे उद्दिष्ट उत्तम होते. ते बऱ्यापैकी पूर्ण होत होते.- डॉ. व्ही.के. पॉल, टास्क फोर्सचे प्रमुख
लसींचे उत्पादन युद्धपातळीवर- कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग मंदावला असला तरी लसींचे उत्पादन वाढविण्याला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. - लसींच्या उत्पादनवाढीला आवश्यक असलेल्या सर्व मंजुऱ्या केंद्राद्वारे देण्यात येत आहेत. त्यातच रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीच्या दहा कोटी मात्रा २० मेपर्यंत भारतात येणार आहेत. - झायडस-कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या लसीच्या आठ कोटी मात्रा जूनमध्ये उपलब्ध होणार आहेत. सीरम आणि भारत बायोटेक यांच्या ११० कोटी मात्राही लवकरच मिळतील, अशा विश्वास आहे. - मार्च, २०२२ पर्यंत देशात १२८ कोटी मात्रा असतील. फायझर, मॉडर्ना व जॉन्सन ॲॅण्ड जॉन्सन यांच्या लसीही येऊ घातल्या आहेत.