coronavirus : इंदूरमध्ये जिथे झाला होता डॉक्टरांवर हल्ला तिथेच सापडले कोरोनाचे 10 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 03:40 PM2020-04-05T15:40:51+5:302020-04-05T15:42:22+5:30
मध्य प्रदेशमधील आर्थिक केंद्र आणि देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवणाऱ्या इंदूरमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
इंदूर - देशात कोरोनाचा फैलाव वाढत असताना मध्य प्रदेशमध्येही कोरोनाबधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातही मध्य प्रदेशमधील आर्थिक केंद्र आणि देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवणाऱ्या इंदूरमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यातच शहरातील टाटपट्टी बखाल परिसरात तपासणी कारण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर जमवाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. मात्र आता याच परिसरात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत.
मध्य प्रदेशमधील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 3 आणि 4 एप्रिल रोजी पाठवण्यात आलेल्या नमुन्यामधील 16 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 10 जण हे टाटपट्टी बाखल परिसरातील आहेत. याच परिसरातील रहिवाशांनी तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर हल्ला केला होता. पॉझिटिव्ह आढळलेल्या 10 जणांमध्ये 5 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी जेव्हा डॉक्टरांनी या परिसरात तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा येथील जमावाने या डॉक्टरांवर हल्ला केला होता. तसेच दगडफेक करून डॉक्टरांना पळवून लावले होते.
दरम्यान, इंदूरमधील टाटपट्टी भागात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, हा हल्ला कुणाच्या चिथावणीवरून करण्यात आला, याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे.