अहमदाबाद : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये अवघ्या १४ महिन्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या रविवारी या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांने अखेरचा श्वास घेतला.
गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी गुजरातमध्ये मंगळवारी सूरत आणि पाटनमध्ये दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन सुरु केले आहे. तरीही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होते असल्याचे दिसून येत आहे.
देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४७८४ वर पोहोचली आहे. तर १२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, कोरोनावर मात करत आतापर्यंत ३२५ लोक या आजारातून बरे झाले आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात एक हजारहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५०८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
सात देशांमध्ये कोरोनाचे ७८ हजारहून अधिक जणांचा बळीजगात कोरोना बाधितांची संख्या १३ लाख, ७८ हजार,५२७ वर गेली असून आतापर्यंत या आजाराने ७८ हजार, ११० जणांचा बळी घेतला आहे. आजच्या घडीला सर्वाधिक म्हणजे ३ लाख, ७७ हजार, ५०० एवढे कोरोनाचे रुग्ण एकट्या अमेरिकेत असून गेल्या २४ तासांत तिथे ११ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेत मृतांची संख्यादेखील वाढत असून मंगळवारी रात्रीपर्यंत आकडा ११ हजार, ८०० वर गेला. इटलीमध्ये मृतांची संख्या १६ हजार, ५२३ तर स्पेनमध्ये १३ हजार, ८०० वर गेली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत ८ हजार, ९०० तर ब्रिटनमध्ये ६ हजार, १६० जण मरण पावले आहेत. इराण आणि चीन या दोन देशांमध्ये मिळून मृतांचा आकडा सुमारे ७ हजार झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जे ७८ हजार लोकं मरण पावले त्यापैकी ६४ हजार जण या सात देशांमधीलच आहेत. मात्र, आतापर्यंत सुमारे तीन लाख रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.