नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे एक डझनांहून अधिक देशांमध्ये अडकून पडलेल्या १५ हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना गुरुवारपासून पुढील एक आठवड्यात मायदेशी परत आणण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. एकूण ६४ विमाने व नौदलाच्या दोन युद्धनौकांमधून ही वाहतूक करण्यात येईल.
संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया, फिलिपाइन्स, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवैत व बांगलादेशासह काही देशांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना विमानाने परत आणले जाईल. ही विमाने एअर इंडिया व त्यांची एअर इंडिया एक्स्प्रेस या उपकंपनीची असतील. या लोकांना विविध शहरांमध्ये आणले जाईल. तेथेच त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवून, नंतरच आपापल्या घरी पाठविले जाईल.
या विमान वाहतुकीची सुरुवात गुरुवारी ७ मे रोजी होईल व ती १४ मेपर्यंत सुरू राहील. सर्वाधिक १५ विमाने केरळमधील लोकांना घेऊन येतील. दिल्ली व तमिळनाडूच्या नागरिकांसाठी प्रत्येकी ११ विमाने वापरली जातील. महाराष्टÑ व तेलंगणाच्या लोकांसाठी प्रत्येकी सात, गुजरातसाठी सहा, जम्मू-काश्मीर व कर्नाटकसाठी प्रत्येकी तीन, तर पंजाब व उत्तर प्रदेशासाठी प्रत्येकी एक विमान येईल. मुंबईला मलेशियातून २५०, न्यूयॉर्कहून ३००, बांगलादेशहून २५०, फिलिपीन्सहून २५० व ब्रिटनहून २५० अशा एकूण १,४०० नागरिकांना परत आणले जाईल.
विषाणूची साथ सुरू झाल्यानंतर परदेशांत अडकलेल्या भारतीयांना एवढ्या मोठ्या संख्येने नियोजनबद्ध पद्धतीने स्वदेशी परत आणण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी फेब्रुवारीत अशीच व्यवस्था केली गेली होती. दरम्यान, भारतीय नौदलाच्या ‘शार्दूल’, ‘मगर’ व ‘जलाश्व’ या युद्धनौकाही अडकलेल्या भारतीयांना परदेशांतून आणण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. यातील दोन युद्धनौका मालदीवमधून, तर एक दुबईमधून भारतीयांना घेऊन येतील. या तीनही युद्धनौका रवाना झाल्या असून, गुरुवारी त्या ठरलेल्या देशांत पोहोचतील. नौदलाने नागरिकांच्या अशा वाहतुकीसाठी एकूण १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रवासाचे भाडे द्यावे लागणार
1) परदेशातील भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया७ मेपासून टप्प्या-टप्प्याने सुरू केली जाणार आहे. संबंधित देशांतील भारतीय राजदूतावास अशा नागरिकांची यादी तयार करीत आहेत. या नागरिकांना विमान किंवा जहाजाने परत आणले जाईल. त्यासाठी भारतीय नागरिकांना प्रवासाचे भाडे मात्र द्यावे लागणार आहे, असे सरकारने सोमवारी स्पष्ट केले होते.2) लंडनहून मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळुरू या प्रवासासाठी ५० हजार रुपये आकारले जाणार आहेत. शिकागोहून दिल्ली, हैदराबाद प्रवासाचे भाडे सुमारे १ लाख रुपये असेल. हे भाडे खूप जास्त आहे; पण विमानात जाताना अजिबात प्रवासी नसतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम जास्त ठेवण्यात आली आहे.यूएईसाठी २ विशेष विमानेसंयुक्त अरब अमिरातीतील भारतीयांना परत आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था सध्या करण्यात आली आहे. किमान दोन लाख भारतीयांनी परत येण्यासाठी दूतावासाकडे नावे नोंदवली आहेत. त्यामुळे गरजेनुसार आणखी विमानांची सोय केली जाईल. ही दोन्ही विमाने तेथून गुरुवारी निघतील. ती केरळच्या विमानतळांवर उतरतील.