नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याने ८ मेपर्यंत कोरोना विषाणूच्या दोन लाखांपेक्षा जास्त चाचण्या करून नवा विक्रम स्थापन केला. देशात एका राज्याने केलेल्या या सर्वात जास्त चाचण्या आहेत. प्रत्येक दहा लाख लोकांमागे १,४२३ चाचण्यांपासून त्या गेल्या पाच दिवसांत १,६४० झाल्या; परंतु यात काळजीची बाब अशी की, महाराष्ट्र देशात दिल्ली, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि हरयाणाने केलेल्या चाचण्यांच्या संख्येच्या यादीत सहाव्या क्रमांकावर घसरला.
महाराष्ट्र दर दहा लाख लोकांमागे चाचण्यांत चौथ्या पायरीवर होता. अशा प्रकारे महाराष्ट्राने दोन लाखांपेक्षा जास्त चाचण्या आतापर्यंत केल्या असून, देशात या सगळ्यात जास्त आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे १७,९७४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर देशात चाचण्यांचे प्रमाण वाढले. मोदी असे म्हणाल्याचे समजते की, दररोज शक्य झाले, तर दोन लाख चाचण्या केल्या जाव्यात. म्हणजे कोविड-१९ बाबत नेमकी परिस्थिती काय, हे ठरवता येईल व लॉकडाऊनबाबतचा सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णय घेता येईल.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अवघ्या एका दिवसात (गुरुवारी) चाचण्या ८०,६३२ वरून १,६१,००७ वर नेल्या व शुक्रवारी हा नवा विक्रम स्थापन झाला. एकूण आयसीएमआरने शुक्रवारपर्यंत १५ लाख चाचण्या केल्या; परंतु जेवढ्या चाचण्या जास्त होत आहेत त्यातून देशात दर दहा लाखांमागे सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. या चाचण्या महाराष्ट्रापेक्षा जास्त संख्येत आहेत. सर्वाधिक चाचण्या या दिल्लीत झाल्या असून, तेथे कोविड-१९ चे दर दहा लाखांमागे २९७ रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रात दर दहा लाखांमागे सरासरी निम्मेच म्हणजे १४६ रुग्ण आहेत.