नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गानंतर आता परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आली आहे. त्यामुळे कोरोनाचे भय कमी झाले आहे. मात्र, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस लागू करण्याच्या नियमात बदल केला आहे. बूस्टर डोस आता 9 ऐवजी 6 महिन्यांनंतर घेता येणार आहे. जर तुम्ही कोरोनाचा दुसरा डोस घेतला असेल, तर आता तुम्हाला बूस्टर डोससाठी 9 महिन्यांऐवजी 6 महिने किंवा 26 आठवडे वाट पाहावी लागेल.तसेच, 18 ते 59 वयोगटातील सर्व लोकांना आता 9 महिन्यांऐवजी 6 महिन्यांनी बूस्टर डोस दिला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले.
लसीकरणावरील सरकारची सल्लागार संस्था नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (NTAGI) दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती. याशिवाय नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने 12 वर्षांखालील मुलांसाठी लसीकरणासाठी शिफारसी देखील दिल्या आहेत. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनच्या सूत्रांनी सांगितले की, 12-17 वयोगटातील लसी कमी घेतल्या जात आहेत, त्या सुधारण्याच्या बाजूने आहेत. या वयोगटातील लोकांना 12 वर्षे वयोगटातील लोकांपेक्षा जास्त धोका असतो. बूस्टर म्हणून CORBEVAX चा वापर करण्यावर नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनकडून अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासन यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, 18-59 वर्षे वयोगटातील खाजगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये (CVCs) दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर सर्वजण बूस्टर डोस घेऊ शकतो. तसेच, पत्रात म्हटले आहे की 60 वर्षे आणि त्यावरील लोक आणि आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंट लाइन कामगारांना 6 महिने किंवा दुसरा डोस 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस विनामूल्य दिला जाईल. दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत बूस्टर डोस घेण्यासाठी 9 महिने वाट पाहावी लागत होती. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, त्यांना डोस घेतल्यापासून सहा महिन्यांनंतर बूस्टर डोस मिळू शकेल.
राज्यात 38 लाख 45 हजार लाभार्थ्यांनी घेतला बूस्टर डोसमहाराष्ट्रात आतापर्यंत 38 लाख 45 हजार लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, कोरोनाची भीती गेल्याने बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. परंतु, कोरोना संसर्गाची तीव्रता सौम्य होण्याच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. साठहून अधिक वयोगटातील सुमारे 20 लाख लाभार्थी बूस्टर डोससाठी पात्र आहेत. त्यातील केवळ 7.25 लाख लाभार्थ्यांनी लसमात्रा घेतली आहे. राज्याचा विचार करता मुंबईत तीन लाख आणि पुण्यात सुमारे दोन लाख लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घेतला आहे.