नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरु आहे.
भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, कोरोना संकट आणि लॉकडाऊन यासह अन्य उपाययोजनांवर शनिवारी देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी दोन आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. याशिवाय, ओडिसा, राजस्थान, तेलंगना आणि पंजाब या राज्यांमध्ये सुद्धा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.