नवी दिल्ली – भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. देशभरात एका दिवसात कोरोनाचे नवीन 103 रुग्ण समोर आले आहेत. तसेच या रोगानं आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातील 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर काही राज्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे.
भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केले आहे. देशातील 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात संपूर्णत: 'लॉकडाऊन' घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र, चंदीगड, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मीर, नागालँड, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपुरा, तेलंगणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर, केरळ, हरियाणा, दमण-दीव-दादरा नगर हवेली, पुदुच्चेरी, अंदमान-निकोबार बेट, गुजरात, कर्नाटक, आसाम ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: 'लॉकडाऊन' करण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरसच्या धसक्याने जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. भारतातील अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे.भारताकडे प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती आहे असं म्हणत WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने भारताचं कौतुक केलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रायन यांनी भारताचं कौतुक केलं आहे. ‘भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केले आहे. कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी भारत उचलत असलेली पावले कठोर असली तरी ती योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरू ठेवलं पाहिजे असंही WHO ने म्हटलं आहे.
मायकल रायन यांनी ‘चीनप्रमाणेच भारत हा देखील जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. कोरोनाचं संकट ओढवल्यानंतर त्यांनी आक्रमक निर्णय घेण्यात आले. कोरोनाशी लढा देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय योग्यच आहेत. तसेच भारताने ज्याप्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आताही दिसून येते आहे’ असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक
Coronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी?; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल
coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन
Coronavirus : राज्यभर संचारबंदी लागू;जिल्ह्यांच्या सीमाही सील