नवी दिल्ली : देशासमोर कोरोना व्हायरसचे संकट गडद होत असून गेल्या २४ तासांत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात मृत्यू झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आजपर्यंत 414 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 12,380 रुग्ण सापडले आहेत. यापैकी १०४७७ जणांवर उपचार सुरु असून १४८९ जणांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडायला लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. ते पुन्हा १९ दिवसांसाठी वाढविण्यात आले आहे. या वाढविलेल्या कालावधीमध्ये काही व्यवसाय, उद्योगधंद्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत रेल्वे, विमान, बससेवा बंदच राहणार आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 718 पैकी 400 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोना एकही रुग्ण तिथे आढळलेला नाही. यामुळे सरकार या जिल्ह्यांना कोरोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे 2-3 आठवडे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.