नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासांत ३,९०० नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची ही दिवसभरातील सर्वाधिक आकडेवारी असल्याने केंद्र सरकारची चिंता आणखी वाढली आहे. याशिवाय दिवसभरात कोरोनाग्रस्त १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.असे असले तरी काही राज्यांकडून रुग्ण व मृत्यू होणाऱ्यांची माहिती देण्यास विलंब होत असल्याने हा आकडा वाढलेला दिसतो, असे मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. काही भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिथे रुग्ण जास्त आहेत तेथे मृत्यूदरही जास्त होण्याची भीती आहे. मात्र, तूर्त भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित असल्याचा पुनरुच्चार अगरवाल यांनी केला.
सकारात्मक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक २७.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरातील आकडेवारी देताना अगरवाल म्हणाले, अनेक राज्यांकडून माहिती येण्यास विलंब होतो. त्यामुळे एकाच दिवशी हा आकडा जास्त दिसतो. रुग्ण दुप्पट होण्याचे सरासरी प्रमाण मात्र कमी होत आहे. आधी ३.४ दिवसांमध्ये रुग्णसंखा दुप्पट व्हायची. लॉकडाउनमुळे हा दर आता १२ दिवसांवर आला आहे.
वेळेत रुग्ण शोधणे, त्यांचे संपर्क तपासणे, त्या सर्वांना क्वारंटाइन करून उपचार सुरू करणे हाच कोरोनाविरोधातील सर्वांत प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे राज्यांनी याकडे लक्ष द्यावे. रुग्ण आढळणे, त्याचे संपर्क तपासणे व उपचार सुरू करणे यात काही राज्यांमध्ये जास्त वेळ लागत असून, तो कमी करायला हवा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने राज्यांना केली आहे. देशात सध्या ३२,१३८ रुग्णांवर उपचार सुरू असून १४,१४२ जण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यापैकी १,०२० सोमवारी घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यात सर्वाधिक २७.४१ वर पोहोचले आहे.मायदेशी आणण्याची सेवा सशुल्कपरदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ही सेवा सशुल्क असेल. परदेशातून येणाºया भारतीयांना १४ दिवसदेखील सशुल्क क्वारंटाइन करावेच लागेल. अशांची कोराना चाचणी होईल. क्वारंटाइन पूर्ण झाल्यावर पुन्हा चाचणी होईल. राज्य सरकारांशीदेखील यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.मजुरांसाठी धावली रेल्वेकामगार दिनापासून देशभरात ६२ विशेष रेल्वे गाड्यांमधून ७० हजारांवर स्थलांतरित मजूर स्वगृही परतले. मंगळवारी मजुरांसाठी १३ विशेष श्रमिक रेल्वे गाड्या धावल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.नवी कार्यसंस्कृतीकेंद्रीय गृह मंत्रालयाने तिसºया लॉकडाउनमध्ये दिलेल्या सवलतींवर पुन्हा स्पष्टीकरण दिले. कार्यालयांमध्ये कमी उपस्थिती, फेस मास्क, दोन फूट अंतर, आरोग्य सेतू अॅप व फिजिकल डिस्टन्सिंगला पर्याय नाही, असे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या. खासगी कार्यालयांमध्ये एकाच वेळी जेवणाची सुटी नको. दोन वेळा ठरवाव्यात. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व स्क्रीनिंग सक्तीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.जगातही चढता आलेखजगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ३६ लाख ९८ हजारांवर गेली असून, मृतांचा आकडाही २ लाख ५६ हजार २४० पर्यंत गेला आहे. त्यात अमेरिकेतील ७० हजार मृतांचा समावेश आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, तिथे आतापर्यंत २९ हजार जण मरण पावले आहेत.स्पेन, इटली आणि फ्रान्समध्येही मृतांची संख्या २५ हजारांहून अधिक आहे.