नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 100 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 4000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत.
कोरोनाशी लढण्यासाठी एका चिमुकल्याने मदतीचा हात दिला आहे. आंध्रप्रदेशमधील एका चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले 971 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले आहेत. हेमंत असं या चिमुकल्याचं नाव असून सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेमंतने सायकल विकत घेण्यासाठी काही पैसे साठवले होते. मात्र देशात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे त्याने सायकलसाठी साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले.
विजयवाडा येथे मंत्री पेरनी वेंकटरामय्यह यांचं कार्यालय आहे. तिथे जाऊन चार वर्षाच्या हेमंतने आपले सायकलसाठी जमा केलेले 971 रुपये कोरोनाशी लढण्यासाठी दिले आहेत. यामुळे चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशात गेल्या 24 तासांत 354 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4421 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 114 वर पोहोचला आहे. देशातील 4421 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 325 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा
Coronavirus: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या २४ तासात तब्बल ३५४ नवे रुग्ण
'फिर मुस्कुराएगा इंडिया...फिर जीत जाएगा इंडिया', नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ